मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात एक मोठा स्फोटा होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री मथुरेच्या रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटामुळे भीषण आग लागली आहे. या आगीत रिफायनरीमध्ये काम करणारे एक अधिकारी आणि १२ कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीला पाठवण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिफायनरीत गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. मथुरा रिफायनरीच्या एबीयू प्लांटमध्ये 40 दिवसांचा शटडाऊन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व काही ठीक असल्याचे निश्चित झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यात आले. त्यात लिकेज झाल्याचा अंदाज आहे आणि भट्टी फुटल्याने हा मोठा स्फोट झाला, त्यानंतर प्लांटला आग लागली. प्लांट बंद झाल्यानंतर स्टार्टअप उपक्रम सुरु असताना आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मथुरा रिफायनरीच्या जनसंपर्क अधिकारी रेणू पाठक यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नसून आग नियंत्रणात आहे.
रिफायनरीच्या पोलीस हद्दीत ही घटना घडली असून रिफायनरीच्या एबीयू प्लांटमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटनंतर रिफायनरीमध्ये एकच गोंधळ उडाला होता. आगीची सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिथे उपस्थित असलेले लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. अग्निशमन दलाने प्लांटमधील एकूण १० जणांना बाहेर काढण्यात आले. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीला दाखल करण्यात आले.