नागपूर : नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या नराधमाने एका 6 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे नराधमाने मुलीच्या शरीरावर चावा देखील घेतला. ही घटना पाचपावली ठाण्यांतर्गत बारसेनगर भागात घडली आहे. या घटनेवर परिसरातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे. धीरेंद्र सुधीर भोतमांगे (वय-55) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धीरेंद्र एका खासगी कंपनीत बॅनर-पोस्टर बनविण्याचे काम करत आहे. चिमुकलीचे वडील मजुरी करतात आणि आरोपीच्या घराजवळच कुटुंबासह राहतात. गेल्या रविवारच्या रात्री धीरेंद्रने चॉकलेट देण्याच्या आमिषाने चिमुकलीला घरी बोलावून घेतले. तेथे आरोपीने चिमुकलीचे लैंगिक शोसन केले. नराधम इतक्यावरच न थांबता त्याने पीडितेच्या अंगाचा दातांनी चावाही घेतला. त्यानंतर याप्रकरणाची कुठंही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत घरी आली.
दरम्यान, या घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त जमाव पीडितेच्या नातेवाईकांसह धीरेंद्रच्या घरी पोहोचला. दोन्ही गटाकडून एकमेकांना शिवीगाळ सुरू झाली. त्यानंतर धीरेंद्रचा भाऊ सत्यजीत भोतमांगे याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने नायब तहसीलदार असल्याचे सांगून कुटुंबाला सुरक्षा देण्याची मागणी केली.
तसेच सत्यजीतने संपूर्ण प्रकरणच बोगस असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावण्याची धमकी देत पोलिस कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून पीडित मुलीच्या कुटुंबीयांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.