संगमनेर : संगमनेर तालुक्यातील साकूर येथे भर दुपारी बसस्थानकाजवळ गजबजलेल्या बाजारपेठेतील कान्हा ज्वेलर्स या दुकानावर पाच जणांनी हवेत गोळीबार करत दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. दरोडेखोरांनी दुकानातील लाखो रुपयांचा ऐवज घेऊन मोटरसायकलींवरून निघूनही गेले. चित्रपटातील प्रसंग वाटावा अशी ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच पथक रवाना झाले होते. दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यात जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच मोटारसायकल ही ताब्यात घेतल्या असून उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.
नेमक काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकूर येथे बसस्थानकाजवळ बाजारपेठेत सोन्या-चांदीचे व्यावसायिक निखिल सुभाष लोळगे यांचे कान्हा ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकानात दुपारी दीडच्या सुमारास ग्राहक सोने खरेदी करत होते. दुकानातील कामगार जेवण करायला गेले होते. दुकानात केवळ एक कामगार होता. त्याच वेळी दोन दुचाकीवरून पाच दरोडेखोर दुकानासमोर आले. त्यातील तिघांनी थेट दुकानात घुसून कामगाराला पिस्तुलाचा धाक दाखवला. उर्वरित दोघे दरवाजात उभे राहिले. तेथे असलेल्या ग्राहकालाही बंदूक दाखवत गप्प बसण्यास भाग पाडले.
दुकानाचे मालक व ग्राहकाला त्यांनी खाली बसवले. दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचा एकेक दागिना मालकासमोर काढून बॅगत भरला. तसेच रोख रक्कमदेखील काढून घेतली. मालकाचा मोबाईलही हिसकावला. हा प्रकार सुरू असताना नागरिकांनी दुकानाजवळ मोठी गर्दी केली होती. मात्र, एकाने पिस्तुलातून हवेत गोळाबार करीत दहशत निर्माण केली. त्यामुळे मोठी गर्दी असूनही कोणीही दरोडेखोरांना रोखण्यासाठी पुढे आले नाही.
काही वेळाने बॅग घेऊन पाचही दरोडेखोर निघून गेले. पुढे मांडवा फाटा येथे नागरिकांनी धाडस करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी पुन्हा हवेत गोळीबार केला. पुढे खडकी रस्त्याला दरोडेखोरांनी दुकान मालकाचा मोबाईल फेकून दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे फौजफाट्यासह साकूरमध्ये दाखल झाले.
या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच पथक रवाना करण्यात आले होते. दरम्यान, पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोरांना पारनेर तालुक्यात जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले असून उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.