-प्रमोद आहेर
श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना सध्या महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराने धसका घेतला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे उर्वरित दिवसात काहीही करण्याची तयारी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघात महविकास आघाडी कडून माजी आमदार राहुल जगताप हे प्रबळ दावेदार होते, मात्र त्यांना ऐन वेळी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळाली नाही. अन् उद्धव ठाकरे पक्षाकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे जगताप हे प्रचंड नाराज झाले होते. तर महायुतीकडून विक्रम पाचपुते हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. श्रीगोंदा मतदारसंघांमध्ये खऱ्या अर्थाने तिरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट तयार झाले आहे.
सध्या तीनही उमेदवारांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच माजी आमदार व बंडखोर उमेदवार राहुल जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या गावभेटीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जगताप यांना महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी नाकारल्याने त्यांना एक प्रकारची सहानुभूती मिळत आहे, असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महाविकास व महायुतीच्या उमेदवारांनी बंडखोर आमदाराचा धसका घेतले असल्याचे दिसते .
भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी देखील कंबर कसली असून आमदार बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, अँड प्रतापसिंह पाचपुते यांनी प्रचार यंत्रणा हायटेक केलेली आहे. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. तर महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे, आदेश शेठ नागवडे यांनी देखील मोठी युव्हरचना आखली असल्याचे बोलले जाते.
राहुल जगताप यांना नगर तालुक्यांतील चिंचोली पाटील व वाळकी गटात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
एक निष्ठेचा विजय होणार
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार राहुल जगताप हे एकनिष्ठ असल्याने त्यांनाच महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळणार असे संकेत होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली. जगताप हे गेले दहा वर्षापासून शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असूनही त्यांच्यावर अन्याय झाल्याने, साहेबांचा आशीर्वाद घेऊन निवडणूक रिंगणात असल्याने जगताप यांना सहानुभूतीची लाट असल्याने विजय निश्चित होणार असल्याचे श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी सांगितले.