लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावरून पायी चाललेल्या एका चालकाचा 15 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत माळीमळा परिसरातील दर्जाबिर्याणी जवळ शनिवारी (ता.9) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरातून रविवारी (ता.10) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली आहे. चोरट्यांकडून दुचाकीसह 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.
दत्ता अंतेश्वर निष्पत (वय-25, निगडे वस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोनु मुस्लीम अन्सारी (वय 28, सध्या रा. भोसले चाळ, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा.बदुलीया, राज्य झारखंड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनु अन्सारी हे लोणी काळभोर येथे कुटुंबासोबत राहत आहेत. सोनु अन्सारी हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सोनु अन्सारी हे त्याच्या वैयक्तिक कामानिमित्त पायी चालले होते. पुणे सोलापूर महामार्गावरून जात असताना, मोटारसायकलवरील दोन अनोळखी इसमांनी सोनु अन्सारी यांच्या हातातील मोबाईल फोन हिसका मारुन जबरदस्तीने चोरुन नेला होता. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा शोध गुन्हे शाखेचे पथक करीत असताना, पथकातील पोलीस हवालदार गणेश सातपुते व पोलीस अंमलदार शैलेश कुदळे यांना सदर गुन्ह्यातील चोरटे हे कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरात दुचाकीवर संशयास्पद थांबलेले आहेत. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी दाखल झाले. तेव्हा दोन्ही आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच, दोन्ही आरोपींनी पळ काढला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. या मध्ये एक 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आरोपी दत्ता निष्पत याला खाक्या दाखविताच आरोपींनी पोलिसांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर 16 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकास त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार गणेश सातपुते, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, चक्रधर शिरगिरे व योगेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.