पुणे : पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीदरम्यान सी व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १५ ऑक्टोबरपासून ते आत्तापर्यंत प्राप्त १ हजार ५४ तक्रारींपैकी ९९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आली आहे. तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित ५७ तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती तक्रार निवारण कक्ष व जिल्हा नियंत्रक कक्षाच्या समन्वय अधिकारी ज्योती कावरे यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल अॅपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वित आहे.
सी-व्हिजिल अॅपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करून आचारसंहिताभंगाच्या तक्रारी करू शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या अॅपमध्ये आहे. अशा प्रकारे १५ ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत १ हजार ५४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांपैकी ९९७ तक्रारींवर कारवाई, तर उर्वरित ५७ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या आहेत.