-संदिप टूले
केडगाव : गेल्या काही दिवसात दौंड तालुक्यातील राजकीय वातावरणाने जोर धरला असून दौंडमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून दौंड मधील जातीय समीकरण पाहता काही प्रभावी ओबीसी नेते आपल्याकडे खेचण्यासाठी लगबग सुरु आहे. कारण दौंडमध्ये ओबीसी मतदार हा निर्णायक असून ज्या बाजूला हे मतदार वळतात त्या बाजूचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे दोन्हीकडून त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते. परंतु दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले.
दौंड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी ओबीसी बहुजन पार्टीचे ओबीसी नेते महेश भागवत यांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले आहे. दौंड तालुक्यात महेश भागवत यांना माळी समाज्याचा मोठा पाठिंबा असून या समाजातून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच महेश भागवत यांनी लोकसभा निवडणुक लढवली असून या निमित्ताने त्यांचे कार्यकर्ते वाढले आहेत. तसेच धनगर समाजाचे नेते आनंद थोरात यांचाही पाठिंबा मिळवण्यात यश आले आहे. कारण दौंडमध्ये धनगर समाजाचे मतदान हे जास्त प्रमाणात असून या समाजावर आनंद थोरात यांचा चांगला प्रभाव आहे. यांचा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभागा असतो. तसेच आनंद थोरात दौंड तालुक्यातील ओबीसी नेते असून माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आहेत. यांचा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग असतो.
मागील 2019 च्या निवडणुकीमध्ये आनंद थोरात व महेश भागवत यांनी राहूल कुल यांच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. तसेच मागील काही दिवसात दौंड शहरातील अनेक दलित संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मागील प्रमाणे काही जातीय गणिते राहुल कुल यांनी जुळवून विविध घटकांचा पाठिंबा मिळत असल्याने त्यांची ताकद दुपटीने वाढली असल्याचे चित्र आहे .