पुणे : महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून राजेंद्र पवार यांनी पदोन्नतीवर गुरुवारी (दि. ०१) कार्यभार स्वीकारला. याआधीचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांची औरंगाबाद परिमंडलामध्ये समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी पवार रुजू झाले आहेत.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रूजू झाले.
त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. सन २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. त्यानंतर पदोन्नतीवर अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. बुधवारी (दि. ३०) श्री. राजेंद्र पवार यांना मुख्य अभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे.
मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सन २००५ मध्ये सलग १० दिवस मुंबई शहरातील महापुरात ५० कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी योगदान दिले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग सुरु असताना जून २०२० मध्ये महाभयंकर ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, मुळशी व वेल्हे तालुक्यातील ५४०० वीज खांबासह वीजयंत्रणा जमीनदोस्त झाली होती.
मात्र चोख नियोजन व अविश्रांत कामांद्वारे राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वात केवळ २५ ते ३० दिवसांच्या कालावधीत ग्रामीण तसेच दुर्गम व डोंगराळ भागातील सुमारे ६ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.
पुणे परिमंडलामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच महावितरणच्या महसूलवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले.