लोणी काळभोर : आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे एका टोळीने अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. हे अपहरण 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अशोक पवार यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यावेळी अपहरण झालेल्या ऋषीराज पवार याने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची व्हिडिओ क्लीप दाखवली.
यावेळी बोलताना ऋषीराज पवार म्हणाले की, “भाऊ कोळपे नामक एका तरुणाने मला सांगितलं की, काही लोकांशी आपल्याला मिटिंग करायची आहे. हा दिवसभर आमच्याबरोबर प्रचारातही फिरला. त्यामुळं हा खेडेगावातला मुलगा असं काही करु शकेल याची मला शंकाही आली नाही. त्यानंतर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो त्यानंतर माझ्या ड्रायव्हरनं ती गाडी मांडवगण वडगाव रोडला एका ठिकाणी नेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर येथून पुढे चारचाकी जाणार नाही, असे त्या मुलाने सांगितले.
निर्जन ठिकाणी जाण्याच्या आगोदरच त्या मुलाने आधीच दोन दुचाकी बोलावून घेतल्या होत्या. त्यानंतर तिथं ऋषीराज पवार त्यांच्या बाईकवर बसून गेले. त्यांनी एका बंगल्यापर्यंत ऋषीराज पवार यांना नेलं. त्यानंतर तिथं तिघेजण रुममध्य शिरले. तिथं त्यांनी रुमचा दरवाजा बंद केला आणि माझे हातपाय पकडले. एकानं माझ्या शर्टची बटणं उघडली, त्यानंतर मी त्याला विरोध केला.”
दरम्यान, ऋषीराज पवार म्हणाले, हे का करत आहात? पैसेच हवे असतील तर आपण देऊ? असे सांगितले. त्यानंतर ऋषीराज पवार याच्या तोंडावर एक कापड टाकून गळा दाबला व ऋषीराज पवार यांना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी एका पिशवीतून एक दोरी काढली आणि आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असं सांगितलं. तसंच यासाठी आम्हाला १० कोटी रुपयांची ऑफर आल्याचे आरोपींने सांगितले आहे. त्यानंतर ऋषीराज पवार याने जीवाला घाबरुन त्यांची मागणी मान्य केली.
त्यानंतर आरोपींनी ऋषीराज पवार यांची कपडे काढले आणि चौथ्या माणसानं एका महिलेला आणलं. त्यानंतर भाऊ कोळपे नामक व्यक्तीनं तिघांना बाहेर काढलं. त्यानंतर त्या महिलेसोबत अश्लिल चाळे करत असल्याचा बनाव करुन त्याचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओत तो संबंधित महिलेला सूचना देताना दिसतो आहे. नंतर त्या महिलेला कुठे पाठवून दिले. अशी तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
निंदनीय राजकारण सुरू आहे. एखाद्याचे जीवन बरबाद करण्याचे काम सुरू आहे. अशा पद्धतीने राजकारण होत असेल, तर हा दुर्देवी प्रकार आहे. तीन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. याच्यामागे कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे.
अशोक पवार (आमदार – शिरूर हवेली)