पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
यासंदर्भात उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने परिपत्रकाद्वारे निर्देश जारी केल्याची माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे. या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ मधील कलम १३५ (व) नुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असलेल्या आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुटी दिली जाईल. ही सुटी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा
इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदानासाठी मंजूर झालेल्या सुटीच्या कारणास्तव अशा कोणत्याही व्यक्तीच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी सुटी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील अथवा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात म्हटले आहे.
तसेच, मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुटी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्यावावत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले