मुंबई: एसटीचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी अध्यक्षपद स्वीकारताच धाडसी निर्णय घेण्यास सुरुवात केली. यामध्ये एसटीला आणखी उभारी देण्यासाठी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनांची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले. मात्र, शिवनेरी सुंदरी नको, सुविधा हव्यात, असा सूर एसटी प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी लावला. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून ई-शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा शिवनेरी सुंदरी सुविधेबद्दल सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
१ ऑक्टोबर रोजी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली. मात्र, दुसऱ्या बाजूला आजही प्रवाशांना सुविधा देण्यात एसटी प्रशासन अपयशी ठरत असताना त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, केवळ अनावश्यक घोषणा करण्यात येत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात आल्या. अशातच ई-शिवनेरी बसेस राज्यभरात धावत नसल्याने आजही अनेक प्रवासी चांगल्या सुविधापूर्ण प्रवासापासून वंचित आहेत.
त्यामुळे आधी जुन्या सुविधांमध्ये सुधारणा करा, मग नवीन योजना आणा, अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून देण्यात आल्या. प्राथमिक विरोध पाहता एसटी महामंडळाकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महामंडळ ई-शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सर्वेक्षण करणार आहे. शिवनेरी सुंदरी ही सुविधा हवी की नको? या सर्व्हेनंतर सुविधा अंमलात आणायची की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.