पुणे : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ हा सर्वांत महत्त्वाचा म्हणून आता ओळखला जाऊ लागला आहे. १७ महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील हा प्रभाग निर्णायक ठरला असल्याने यावर आता महाविकास आघाडीकडून लक्ष ठेवले जात असून, त्यानुसार रणनीती आखली जात आहे. याच वेळी देशात गाजलेला ‘धंगेकर पॅटर्न’ हा महायुतीला या ठिकाणी त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आघाडीकडून ‘होम टू होम’ प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली होती. उमेदवारी जाहीर होत असताना कायम कसब्याची उमेदवारी ही सुरुवातीलाच जाहीर केली जाते. मात्र, यंदा उमेदवारीवरून या ठिकाणी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहावयास मिळाले होते. ब्राह्मण उमेदवार असावा, अशी मागणी करण्यात आली असताना केवळ केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या आग्रहामुळे ब्राह्मणेतर उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी माजी सभागृह नेता धीरज घाटे हे नाराज झाले. त्यांनीही अद्याप या ठिकाणी तसा प्रचारात सक्रिय सहभाग घेत नसल्याचे दिसून येत आहे.
बापट यांच्या घरात उमेदवारी द्यावी किंवा मुक्ता टिळक यांच्या मुलाला उमेदवारी द्यावी, असाही मतप्रवाह होता. तो डावलून पुन्हा ‘पडेल’ उमेदवार देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. याउलट महाविकास आघाडीचा प्रचार हा एकसंधपणे दिसून येत आहे, पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने प्रचार करून यश संपादन केले होते. त्यानुसार आता प्रचाराची रणनीती आखली जात आहे. त्यात सर्वांत महत्त्वाचा प्रभाग क्रमांक १५ हा ठरणार आहे. या प्रभागातून मविआला मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याचे बोलण्यात येत आहे.