नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पारंपरिक उन्हाळी सुट्ट्यांचे नाव बदलून ‘अशंतः न्यायालयीन कामकाजाचे दिवस’ असे नामांतर केले आहे. यासंदर्भात नुकतीच एक अधिसूचना काढण्यात आली. त्यानुसार, न्यायालयाच्या अंशतः कामकाजाच्या दिवसांची संख्या रविवार वगळता ९५ दिवसांपेक्षा अधिक नसेल. सरन्यायाधीश या दिवसांची संख्या निश्चित करतील. तसेच या कालावधीत काम करणाऱ्या न्यायमूर्तीची नियुक्ती देखील सरन्यायाधीशांकडून केली जाईल.
सर्वोच्च न्यायालयाला उन्हाळी, दिवाळीच्या सुट्ट्या असतात. न्यायालयाच्या सुट्ट्यांवर अलीकडे मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात येत आहे. मात्र सुट्ट्या असल्या तरी न्यायालयाचे कामकाज पूर्णपणे बंद नसते. सुट्टीतील खंडपीठासमोर सुनावणी होत असतात. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुट्टीच्या दिवसांत देखील काम करत असल्याचे सांगितले होते.