पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनीटचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात असताना ते नियमितपणे जितका वापर होईल तितके बिल काढण्यासाठी १ हजार ६०० रुपयांची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ह प्रभागातील पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना सापळा रचून पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात केली.
पाणी मीटर निरीक्षक विकास सोमा गव्हाणे आणि कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर आशा कानिफनाथ चौपाली अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदार यांचे पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात आहे. ते नियमितपणे म्हणजे जितका वापर होईल तितके बील काढण्यासाठी पाणी मीटर निरीक्षक विकास गव्हाणे याने स्वत:साठी १ हजार रुपये व कॉम्प्युटर ऑपरेटर आशा चौपाली हिच्यासाठी ६०० रुपये असे १ हजार ६०० रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता आशा चौपाली यांनी तक्रारदार यांच्या पाणीपुरवठ्याचे बील नियमित करुन देण्यासाठी स्वत:साठी ६०० रुपये व विकास गव्हाणे याच्याकरीता १ हजार रुपये असे मिळून १ हजार ६०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ह प्रभाग कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून १ हजार ६०० रुपये स्वीकारताना अशा चौपाली हिला पकडण्यात आले.
त्यानंतर आशा चौपाली हिने विकास गव्हाणे याला त्यांच्यासाठी तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या लाच रक्कमबाबत फोन वरुन विचारले असताना विकास गव्हाणे याने त्याच्यासाठी स्वीकारलेली रक्कम आशा चौपाली हिच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोघांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले करीत आहेत.