वाघोली : वाघोली परिसरात डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा अखेर रविवारी (दि.३) मृत्यू झाला. मनीषा बाळासाहेब मंडलिक (वय २३, रा. वाघोली) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. मनीषाने २३ दिवस मृत्यूशी झुंज दिली. तिच्या मृत्यूनंतर डंपर चालकावर गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले आहे.
१० ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वाघोलीत पुणे-नगर महामार्ग ओलांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ डंपरने मनिषाला धडक दिली होती. या धडकेत मनीषाचे दोन्ही पाय डंपर खाली आल्याने ती गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, आमदार अशोक पवार यांनी तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करून नंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयात तिची उपचाराची सोय केली होती.
मनिषा ही खासगी नोकरीला होती. तसेच कुटुंबासाठी आधार होती. डंपर चालक अनिल शंकर तुरुकमारे (वय ३८ वर्षे रा. तितिक्षा पार्क, आळंदी फाटा, लोणीकंद) याच्यावर दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिच्या मृत्यूनंतर चालकावर गुन्ह्याचे कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.