पुणे : गेल्या ४ वर्षांपासून बंगाली महिलेला वेश्या व्यवसायाला लावून तिच्या कमाईतील ३० ते ३५ लाख रुपये घेऊन तिला मारहाण केली. त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या कुंटणखाना चालक पापा शेख याच्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पापा शेख ऊर्फ बाबू भैय्या (४५, रा. नवीन बिल्डिंग, बुधवार पेठ), त्याची पत्नी रूपा (४०) आणि मॅनेजर संजू (३८, रा. नवीन बिल्डिंग, बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पापा शेख ऊर्फ बाबू भैय्या हा बुधवार पेठेतील नवीन बिल्डिंगमध्ये कुंटणखाना चालवण्याबरोबरच तेथून जवळच असलेल्या शेट्या मारुती मंदिराजवळही एक कुंटणखाना चालवत असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.
याबाबत मूळ पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेल्या एका २८ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पापा शेख हा सातत्याने मारहाण करत असल्याने व खर्चाला पैसे देत नसल्याने ही महिला त्याच्या तावडीतून निसटून बहिणीकडे गेली. त्यानंतर दोघींनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हिच्या ओळखीच्या एका मुलीने सुमारे ४ वर्षांपूर्वी पुण्यात घरकाम मिळवून देण्याच्या आमिषाने फिर्यादी हिला पुण्यात आणून पापा शेख याला विकले. फिर्यादी यांना त्यावेळी केवळ बंगाली भाषा येत होती. बंगाली भाषा बोलणाऱ्या मुलीकडून येथे वेश्या व्यवसाय केला जातो, याची माहिती मिळाली. नाईलाजाने पापा शेख सांगेल त्याप्रमाणे तिला बळजबरीने वेश्या व्यवसाय करावा लागला. पापा शेख तिला दर महिना १० ते १५ हजार रुपये देऊ लागला.
तिने केलेल्या प्रत्येक कामाचे अर्धे तिला व अर्धे पापा शेख याने घ्यायचे हे ठरले होते. ती दर महिन्याला अंदाजे दोन ते अडीच लाखांचे काम करत होती. तरीही पापा शेख याने तिला कधीच पूर्ण पैसे व हिशोब दिला नाही. तिने त्याला वेळोवेळी पैशांची मागणी केली. परंतु तो तिला पैसे न देता सतत जिवे मारण्याची धमकी देत होता.
२७ ऑक्टोबर रोजी तिने रूमवर काम करणाऱ्या मावशीच्या फोनवरून पापा शेख याची पत्नी रूपा हिला फोन करून मला आता पैशांची गरज असल्याचे सांगितले. तेव्हा तिने पैसे नंतर देते, असे सांगितले. त्यानंतर पापा शेख, त्याची पत्नी रूपा व मॅनेजर संजू हे तिच्या रूमवर आले. त्यांनी तिला सारखे पैसे का मागते? या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
यामुळे फिर्यादी घाबरून गेल्या. सतत होणारी शिवीगाळ, मारहाणीला वैतागून तिने तेथून पळून जाण्याचा निश्चय केला. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास ती कोणाला काही न सांगता तेथून पळून आपल्या बहिणीकडे आंबेगाव येथे गेली. तिने धीर दिल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांची हकिकत ऐकल्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.