पिंपरी (पुणे): तुमच्या आधारचा गैरवापर झाल्याने तुमच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत व या गुन्ह्यात तुम्हाला डेथ पेनल्टी (मृत्युदंडाची शिक्षा) होणार असल्याची भीती दाखवत महिलेची ८ लाख २१ हजार २१५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी (दि. ६) रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संबंधित मोबाईलधारक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ ऑक्टोबर रोजी रावेत येथे घडली. फिर्यादी घरात असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. टेलिकॉम अॅथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले. तुमचा नंबर बंद होणार असून तुमच्या आधार कार्डला दुसरा कोणीतरी दुसरा नंबर लिंक केल्याने माहितीचा गैरवापर झाल्याचे सांगितले. तसेच तुमच्याविरोधात अंधेरी व मुंबई येथे गुन्हा दाखल आहे व त्याबाबतची खोटी कागदपत्रे फिर्यादी यांना पाठवली. त्यामध्ये नरेश गोएल नावाचा आरोपी असून त्याचे मनी लॉड्रिंगचे तसेच ह्युमन ट्रॅफिंगचे मोठे नेटवर्क असल्याचे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांचा कॉल तोतया सीबीआय ऑफिसरकडे ट्रान्सफर करून त्यांनी फिर्यादी यांना तुमचादेखील नरेश गोएल याच्यासोबत सहभाग असून तुम्ही सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत अशी बतावणी केली. या गुन्ह्यामध्ये डेथ पेनल्टीची शिक्षा होणार असल्याची भीती दाखवली. तसेच तुम्हाला वाचायचे असेल तर तुमच्या सर्व बँक डिटेल्स पाठवून प्रोसिडिंग करण्यास सांगून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांवर एकूण ८ लाख २१ हजार २१५ रुपये घेऊन फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.