लोणी काळभोर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच गरम झालं आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर (ता. हवेली) येथे अजित पवार यांची शनिवारी (ता. 9) सकाळी साडे दहा वाजता सभा होणार आहे.
शिरूर विधानसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर कटके निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची लोणी काळभोर येथील खोकलाई चौकात शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सभा होणार आहे. या सभेत अजित पवार पुणे सोलापूर, पुणे नगर मार्गाची दुरवस्था व वाहतूक कोंडी, रिंग रोड, उड्डाणपूल, घोडगंगा व यशवंत सहकारी साखर कारखाना, नागरिकांच्या समस्या व विकासाच्या बाबतीत काय बोलणार ? त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदार संघात खरी लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर कटके व महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यात होणार आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथील सभेत अजित पवार आपली भूमिका काय मांडणार व मतदानाचा कौल कसा आपल्या बाजूने फिरवणार ते पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
या सभेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर)शरद बुट्टे पाटील, सुरेश घुले, पै. संदीप भोंडवे, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, दादा पाटील फराटे, बाळासाहेब सातव व महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिली आहे.
माऊलीचे वार वाहू लागलं…
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचे गावागावात जंगी स्वागत करण्यात येत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहेत. माऊली कटकेंची मतदार संघात लोकप्रियता वाढत चालली आहे. ज्ञानेश्वर कटके यांचे कुंजीरवाडी, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील चौकाचौकात फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात माऊलीचे वारे जोरदार वाहू लागले आहे.