मुंबई: भांडुपमधील ३४ वर्षीय महिलेला दुर्मीळ क्षयरोगाचा संसर्ग आढळला. तिला औषधे देण्यात येत होती; परंतु तिची प्रकृती बिघडल्याने तिला मुलुंड येथील अॅपेक्स हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर यांच्याकडे दाखल करण्यात आले, त्यांनी टीबीचा हा दुर्मीळ विषाणू संसर्ग असून त्याला नॉनट्यूबरकुलस मायकोबॅक्टेरिया म्हटले जात असल्याचे सांगितले. या महिलेवर उपचार सुरू असून ६ महिने डॉक्टरांकडून लक्ष देण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये अॅटिपिकल टीबी बँक्टेरिया हा दुर्मीळ टीबी बॅक्टेरियाचा रुग्ण आढळला आहे. भांडुप येथे राहणाऱ्या ३४ वर्षे महिलेला ४ दिवसांपासून डाव्या कानात सूज आली होती. या महिलेने तत्काळ नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. शीतल राडिया यांच्याशी संपर्क साधून उपचार सुरू केले; परंतु ४ दिवसांनी काहीच फरक पडला नाही. वेदना कमी झाल्या नाहीत, कानांवरील सूज वाढत होती. आम्ही या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. कानाला भरपूर सूज आली होती, आम्ही लगेचच अँटिबायोटिक्स व इतर औषधे सुरू केली.
मेंदू आणि कानाचा एमआरआय करण्यात आला. तसेच शस्त्रक्रियेद्वारे पू काढला आणि चाचण्यांसाठी पाठवण्यात आला, चाचण्यांमधून असे आढळून आले की, हे अॅटिपिकल टीबी बॅक्टेरिया आहे, ज्यामुळे कानात संक्रमण होते. कानात अशा प्रकारच्या संक्रमणाची शहरातील ही पहिलीच केस आहे. अशा प्रकारच्या केसेस मलेशिया येथे आढळल्या होत्या. आम्ही या महिलेवर पुढील सहा महिने लक्ष ठेवून असणार आहोत, असे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. हार्दिक ठक्कर यांनी सांगितले.