पुणे : पुणे आणि परिसरात थंडीला सुरुवात झाली असून, अनेक भागात गारठा वाढला आहे. गुरुवारी (दि. ७) शहराचा पारा १५.२ अंश सेल्सिअस होता. तर, एनडीए येथे किमान तापमान १३.७ अंश सेल्सिअस इतके नीचांकी नोंदविले आहे. त्यामुळे पुण्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आगामी काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून, सकाळी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या आकाश निरभ्र झाले असून हवामान कोरडे आहे. तसेच सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले आहे. शहरात कमाल तापमानात चढउतार सुरू आहे. दुपारी उन्हाचा चटका कायम असला तरी तो कमी झाला आहे. येत्या ८ ते १३ नोव्हेंबरदरम्यान आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे. तर, सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर, कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ ते १८ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे.