पुणे : पहाटेच्या तापमानात घट होत असल्याने राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात काही जिल्ह्यातील तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा चटका जाणवत असतानाच रात्री थंडी वाढत आहे. दिवाळी संपली आणि पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात उकाडा वाढला होता. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे थंडी कधी पडणार असा प्रश्न सर्वांना पडत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मनारच्या आखातापासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिक आहे. तर राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानात वाढ होत आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत वाढली आहे.
राज्यामध्ये पुढील पाच दिवस कोरड्या हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यात सकाळी आणि रात्री मोठी थंडी जाणवू लागली आहे. गुरूवारी सकाळी पुण्यात 15.2 अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमान नोंदवले गेले. तर सांगलीत सर्वाधिक राज्यात सर्वात कमी 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचा कडाका वाढणार आहे.