संतोष पवार
पुणे : सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात निवडणूकीच्या प्रचारात सोशल मिडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर होत असल्याचे चित्र दिसत आहे. डिजिटल जमान्यात प्रत्येकाजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने प्रचार करणे सुकर बनले आहे. काही वर्षांपूर्वी उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हातामध्ये प्रचारपत्रके घेऊन घरोघरी जावे लागत असे. रिक्षांवर भोंगे लावून ध्वनिमुद्रित संदेश मतदारांपर्यंत पोहचवला जात असायचा. परंतु काळ बदलला आणि प्रचारपद्धतीत सुद्धा नाविन्यता निर्माण झाली.
फेसबूक इंस्टांग्राम व्हॉट्सॲप यूट्यूबसारख्या डिजिटल समाज माध्यमाद्वारे प्रचाराचा धुराळा उडत आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार पदफेरी, भेटीगाठी प्रचारसभा यांचे आयोजन करत असून त्यामध्ये सोशल मिडियाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल मीडियावर रील्स व्हिडिओ छायाचित्रांचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला जातो आहे.
उमेदवारांचे आणि पक्षांचे जाहिरनामे, केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा व्हाट्सॲप वरील संदेश एसएमएसच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. जागोजागी उमेदवारांचे छायाचित्रांसहित असणारे प्रचारफलक प्रचाराची रंगत वाढवत आहेत. हायटेक युगात सोशल मिडिया हे प्रचाराचे महत्वाचे साधन ठरत आहे.