लोणी काळभोर : जुन्या वादाचा राग मनात धरून पुतण्या, त्याची पत्नी व मुलाकडून शिवीगाळ करून बँटने मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कन्या प्रशालेजवळ मंगळवारी (ता. ५) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश साहेबराव बनकर (वय ३८) रेखा महेश बनकर (वय ३२) व संदेश महेश बनकर (वय २५, सर्व रा. लोणी काळभोर, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी रामचंद्र लक्ष्मण बनकर (वय ६९, कन्या प्रशाळेजवळ लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र बनकर हे शेतकरी असून ते कुटुंबासोबत लोणी काळभोर मध्ये राहतात. फिर्यादी व आरोपींच्या काही दिवसांपूर्वी काही कारणास्तव वाद झाला होता. या जुन्या भांडणाचा राग मनात धरून महेश बनकर, रेखा बनकर व संदेश बनकर हे फिर्यादी रामचंद्र बनकर यांच्या घरी आले. व फिर्यादी रामचंद्र बनकर यांना शिवीगाळ करुन घरातुन बाहेर ओढुन काढले. त्यानंतर फिर्यादी रामचंद्र बनकर यांना आरोपींनी त्यांच्या घरात घेऊन गेले. आरोपी महेश बनकर याने फिर्यादी रामचंद्र बनकर यांना हाताने मारहान केली. संदेश बनकर याने त्याच्या हातातील बँटने फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या दंडावर व उजव्या पायाच्या मांडीवर मारहाण केली. तर रेखा बनकर यांनी शिवीगाळ केली.
याप्रकरणी रामचंद्र बनकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय दंड संहिता कलमकलम ११८ (१), ११५(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतन धेंडे करीत आहेत.