प्रमोद आहेर
श्रीगोंदा : गुजरातच्या २ व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे करण्यासाठी आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले. आता तीच मंडळी श्रीगोंदा मतदार संघात एक अधिकृत तर एक अनधिकृत उमेदवार उभे करून सत्ता मिळवू पाहत आहेत. त्यांना रोखण्यासाठी राज्यात लोकांनी महाविकास आघाडीला साथ देण्याचे ठरवले आहे. तुम्ही देखील अनुराधा नागवडे यांना विजयी करून सरकार आणण्यात भाग घ्या. असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तालुक्यातील वांगदरी येथे महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.अध्यक्ष स्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे होते.
आपल्या खास शैलीत भाजप आणि अपक्ष उमेदवार वर टीका करताना खा. राऊत म्हणाले स्व.शिवाजीराव नागवडे यांनी साडे सात वर्षे आमदार असताना मतदार संघाचे रूप पालटले, पण विरोधी आमदारांनी ४० वर्ष प्रश्न प्रलंबित ठेवले. तर अपक्ष उमेदवाराने आमदार असताना रस्ते केले नाहीत. आता ते रोड रोलर घेऊन निघाले आहेत रोड रोलरचा स्पीड सगळ्यांना ठाऊक आहे. रोड रोलर रस्त्यातील खड्ड्यात अडकून पडेल. त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांना पक्ष कसा उमेदवारी देईल असा सवाल केला.
यावेळी बोलताना उमेदवार अनुराधा नागवडे यांनी भाजप आणि अपक्ष उमेदवार वर चौफेर टीका केली. नागवडे म्हणाल्या समोरील उमेदवाराच्या आईने माझ्यावर टीका करताना मला त्यांनी केलेली विकास कामे दिसत नाहीत. कारण, मी गांधारी आहे, अशी टीका केली. ठीक आहे मी विरोधक असल्याने गांधारीची उपमा दिली पण उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळत नाही, रोजगार नाही, एमआयडीसी नाही, साकळाई उपसा सिंचन योजना झाली नाही.
हा जनतेचा आक्रोश आहे, ते नाराजी दाखवत आहेत. त्या जनतेला तुम्ही कोणती उपमा देणार? त्यांना काय उत्तरे देणार? असा सवाल केला तसेच भाजप उमेदवार स्वतः ची उमेदवारी महिला सन्मान, युवक सन्मानासाठी असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे आईला मिळालेली उमेदवारी रद्द करून स्वतः साठी घेतली.
हाच का तुमचा महीला सन्मान? घरात चुलत भावाला सरपंच करण्या ऐवजी सख्या भावाला उमेदवारी दिली हाच का युवकांचा सन्मान? आज भाजपला उमेदवारावर विश्वास नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारावर देखील लक्ष ठेवले पण हे दोन्ही उमेदवारांना जनता स्वीकारणार नाही. असे सांगून अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यावर टीका करताना नागवडे म्हणाल्या की, राज्यात जसे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष, चिन्ह एकनाथ शिंदे यांनी घेतले ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला तसाच त्रास आम्हाला जगताप यांनी दिला.
दिवंगत शिवाजीराव नागवडे यांच्या मदतीने आमदार झाले पण कधी भेटायला आले नाही, स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या अंत्यविधीला ,दशक्रिया विधीला सर्वात उशिरा येणारी व्यक्ती म्हणजे राहुल जगताप आणि श्रध्दांजली फ्लेक्सचे बिल नागवडे कारखान्याकडे पाठवणारी व्यक्ती राहुल जगताप आहेत. एवढे त्यांचे दिवंगत नागवडे यांच्या प्रती प्रेम आणि आता अपक्ष निवडणूक लढवताना दिवंगत शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरत आहे. हे बेगडी प्रेम कामी येणार नाही. या उलट स्वतःला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळत असताना साजन पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आमची शिफारस केली.असे नागवडे म्हणाल्या.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी मतदार संघात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. विरोधकांनी आपले फोटो वापरले तरी जनता जागृत आहे. विकास कामे कोण करू शकतो याची खात्री नागवडे रूपाने जनतेला
झालेली आहे, असे सांगितले.
राहुल जगताप यांचे राजकारण देवेंद्र फडणवीस चावतात?
महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार प्रचारात खासदार शरद पवार, राहुल गांधी, दिवंगत शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरत आहे. पण उपयोग होणार नाही. त्यांनी हव तर काल परवा विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावायला पाहिजे असे संजय राऊत म्हणताच एकच हशा पिकला.