अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : साखरा दरा (ता. वणी) येथील आरोपी खिमेश वंसता जगनाडे (वय 28) यांस भादंवि कलम 354 अ, 452 सह कलम 8 पोक्सो अंतर्गत केळापूर येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ 4000 दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी 3 महिण्याची शिक्षा आरोपीला अतिरिक्त भोगावी लागणार आहे. शासनाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे यांनी मांडली.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, 1 डिसेंबर 2014 रोजी दुपारी 5.30 वाजताच्या सुमारास आरोपी खिमेश वसंता जगनाडे हा पिडीता एकटी घरी असतांना घरात घुसून अल्पवयीन पिडीतेला छेळुन तिचा विनयभंग केला. पिडीतेने आरडा ओरड केली असता शेतातून तिची आई संगिता ही घरी आली. आरोपीला असे का केले म्हणून विचारणा केली असता, आईला हाता-बुक्याने मारहाण केली व तुझ्याने होते ते करुन घे, अशी धमकी दिली.
सदर घटनेची तक्रार आई संगिता हिने मुकूटबन पोलिस ठाण्यात केली. त्यावरून आरोपी खिमेश वसंता जगनाडे विरुद्ध अपराध क्रमांक 75/2014 अन्वये भादंवि कलम 354 अ, 452, 323, 506 सहकलम 8 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल मारोती टोंगे यांनी करुन केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षाने एकूण 7 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचे पुरावे ग्राहय धरण्यात आले. त्यामुळे आरोपी खिमेश वसंता जगनाडे यांस 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व 4 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 4 हजार रुपये दंडापैकी 3 हजार रुपये पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी दिले. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. रमेश डी. मोरे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस उप निरीक्षक मनोहर कुमरे यांनी काम पाहिले.