मुरुडः मुरुड-आगरदांडा या जंगलजेट्टीवरून मागे येत असताना ब्रेक न लागल्याने चालकाचा ताबा सुटून टेम्पो थेट समुद्रात कलंडल्याची घटना घडली. जंगलजेट्टीची सेवा अनेक वर्ष सुरू आहे, परंतु जेट्टीवर चढताना टेम्पो थेट समुद्रात कलंडण्याचा प्रकार हा प्रथमच घडल्याने प्रवासी भयभीत झाले होते. मुरुडमधील मुसव्विर जमादार यांच्या टेम्पोवर सफैअली सनावर सैयद हा चालक म्हणून काम करतो. तो पाण्याच्या बॉक्सने भरलेला टेम्पो घेऊन दिघी येथे जाण्यासाठी आगरदांडा जेट्टीवर आला होता. यावेळी सुर्वण दुर्ग या जंगलजेट्टीतून टेम्पो मागे घेताना सफैअली सनावर सैयद याला जेट्टीवर पसरलेल्या शेवाळाचा अंदाज आला नाही.
त्याने अचानक ब्रेक दाबताच गाडीवरील ताबा सुटला आणि टेम्पो थेट समुद्रात कलंडला. प्रसंगावधान राखत टेम्पोतून उतरलेला चालक पोहत किनाऱ्यावर आला. परंतु नाका-तोंडात पाणी शिरल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या सहकाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.