नवी दिल्ली: देशात गोपनीय वैयक्तिक माहिती मिळवण्याच्या उद्देशाने आणि अधिकृत प्रणालीमध्ये अवैधरीत्या प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने ‘विशिंग’ हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे फोन कॉल येताच कॉलर आयडीवरील माहितीवर विश्वास ठेवू नये. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते, असा मौलिक सल्ला सायबर सुरक्षा सल्लागाराने शासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.
शासकीय अधिकाऱ्यांसाठी सायबर धोक्यांपासून सावध राहण्याचे दिशानिर्देश राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) जारी केले. एनआयसीने विविध सरकारी विभाग व मंत्रालयांना पाठवलेल्या दिशानिर्देशांमध्ये म्हटले आहे की, हल्लेखोर वरिष्ठ सरकारी अधिकारी, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था किंवा तांत्रिक सहायक कर्मचाऱ्यांसारख्या विश्वसनीय संस्थांचे रूप धारण करू शकतात. आपण कॉल केलेला क्रमांक हा वैध सरकारी आहे, हे भासवण्यासाठी हल्लेखोर कॉलर आयडीच्या माहितीत हेराफेरी करतात. देशात गोपनीय माहिती मिळवणे व अधिकृत प्रणालीमध्ये अनधिकृतपणे पोहोचण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना निशाणा बनवण्यासाठी ‘विशिंग हल्ले’ वाढले आहेत. म्हणूनच आम्ही अधिकाऱ्यांना सावध करीत असल्याचे एनआयसीने स्पष्ट केले.
पीडितांना गोपनीय माहिती देण्याच्या उद्देशाने प्रलोभन दाखवण्यासाठी फसवणुकीचे कॉल किंवा व्हॉईस मेसेजचा अनधिकृत वापर करणे हे ‘विशिंग सायबर’ हल्ल्याचे एक रूप आहे. अत्यंत तातडीचा संदेश देणे, लक्षित व्यक्तीला माहिती देण्यासाठी बाध्य करणे, जर आमची माहिती स्वीकारली नाही तर गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देणे किंवा भ्रमित किंवा भीती घालण्यासाठी गुंतागुंतीची भाषा वापरण्याच्या रणनीतीचा वापर हल्लेखोर करू शकतात. कॉलर आयडीवर दिसणाऱ्या माहितीवरून सहजपणे फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी यापासून सावध राहावे, असे आवाहन एनआयसीने केले.
एखादा कॉल आल्यानंतर त्या क्रमांकावर पटकन विश्वास ठेवू नका. अधिकृत रेकॉर्डसह संबंधित एजन्सीचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कॉलरची पडताळणी करण्याचा सल्लासुद्धा एनआयसीने अधिकाऱ्यांना दिला आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशील माहिती देण्यापूर्वी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कॉल करणाऱ्याची ओळख पटवून घ्यावी. संशयित व्यक्तीद्वारे देण्यात आलेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी वेळ घ्यावा, कामाच्या वेळी किंवा इतर सुरक्षित सायबर संवादासाठी स्थापित मापदंडांचे पालन करण्याचा सल्ला एनआयसीने दिला.