लोणी काळभोर : उधार सिगारेट न दिल्याचा राग मनात धरुन एकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून टपरी चालकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारुन पेटकरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता.१) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात टपरी चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी कुंजीरवाडी येथील एकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकी ऊर्फ विकास शिंदे (रा. पेटकरवस्ती, कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जगन्नाथ चंद्रकांत जाधव (वय ३३, रा. कुंजीरवाडी, पेटकर वस्ती, ता- हवेली जि पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगन्नाथ जाधव हे पानटपरी चालक आहेत. विकी ऊर्फ विकास शिंदे याने फिर्यादी जाधव यांना उधार सिगारेट मागितली होती. यावेळी जाधव यांनी उधार सिगारेट देण्यास नकार दिला होता. याचा राग शिंदे याने धरला होता. दरम्यान, शुक्रवारी फिर्यादी जाधव व त्यांचा भाऊ बापुराव जाधव दुचाकीवरून घरी चालले होते. तेव्हा विकी शिंदे याने त्याच्या ताब्यातील दुचाकीने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. फिर्यादी व त्यांचा भाऊ मोटारसायकलसह खाली पडले.
या धडकेत फिर्यादी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी विकी शिंदे याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली व नादाला लागायचे नाही. अशी धमकीही दिली. अशी फिर्याद जगन्नाथ जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी विकी ऊर्फ विकास शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118 (1), 126 (2), 352, 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.