यवतमाळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह झाले असून, जिल्ह्यातील सातही मतदारसंघात कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे. गत काही दिवसांत २२ लाखांच्या रोकडसह ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ आहे. त्यात यवतमाळ, वणी, राळेगाव, आर्णी, दिग्रस, पुसद व उमरखेड या सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील काही विधानसभा मतदारसंघ संवेदनशील म्हणून घोषित केले. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ व आर्णी या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त पथक नेमण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले. त्यानंतर पोलीस प्रशासनासह भरारी पथक चांगलेच अॅक्टिव्ह झाले असून, कारवायांचा धडाका लावण्यात आला आहे.
आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत देशी, विदेशी अशी एकूण आठ हजार ३१३.२ लीटर दारू पाच लाख ८५ हजार ५५५ रुपये, २२ लाख ९७ हजार ६०० रुपयांची रोकड, २१ लाख ५० हजारांची तीन वाहने, ४६ हजार २०५ रुपयांचा गुटखा, दारू जप्तीमधील इतर साहित्य ५९ हजार २०० असा एकूण ५१ लाख २९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच काही प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले.