जालना: जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात आता उमेदवार प्रचाराला लागले आहेत. या निवडणूकीत अपक्ष उमेदवारांना मिळालेली चिन्हे जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या निवडणूकीत शिमला मिर्ची, सफरचंदासह अन्य घरगुती वापराच्या वस्तु भाव खावून जाणार असून तुतारी वाजवणाऱ्या माणसासह ऊस शेतकरी, अॅटोरिक्षांसह अन्य विविध प्रकारचे चिन्हे यंदाच्या निवडणूकीत लक्षवेधी ठरत आहेत.
राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त निवडणूक चिन्हे राखीव ठेवून निवडणूक विभागाने अपक्षांसाठी ठेवलेली चिन्हे उमेदवारांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे. घरगुती वापराच्या वस्तूंसह शिट्टी, ग्रामोफोन, संगणक, प्रेशर कुकर, फलंदाज, अँटोरिक्षा, शिवणयंत्र, बॅट, टिव्ही रिमोट, इस्त्री, हातगाडी, कॅमेरा, कपाट आदी चिन्हे कळपात धमाल करणार आहे. कुठल्याही निवडणूकीत चिन्हाची विशेष जागा असते. त्यामुळे उमेदवारांनी अगोदरच तीन चिन्हांचे पर्याय सुचविले होते. त्यापैकी एक चिन्ह अपक्ष उमेदवारांना मिळाले आहे.
आता खऱ्या अर्थाने अपक्ष उमेदवारही कामाला लागले आहे. आतापर्यंत उमेदवार अर्ज भरायचा कि नाही, याचीच चर्चा होती. आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चिन्ह निवडीचा विषय आला. राजकीय पक्षांची चिन्हे तर ठरलेलीच असतात, परंतू खरी धमाल असते, ती अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांची. वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे यंदाच्या निवडणूकीत आकर्षणाचा विषय ठरणार आहे. गेल्या अनेक निवडणूकांमध्ये अपक्षांच्या चिन्हांनी मोठी धमाल केली होती, उमेदवारांपेक्षा ही चिन्हेच चर्चेचा विषय ठरली होती, परंतू काळानुरूप आता चिन्हेही बदलली असून आता अनेक प्रकारची चिन्हे निवडणूक विभागाने अपक्ष उमेदवारांना बहाल केली आहेत.
निवडणूक चिन्हांवर नजर फिरवली तर अनेक चिन्हे आपल्या दैनंदिन वापराची आहे. त्यामुळे चिन्हांची निवड करताना उमेदवारांची मोठी दमछाक झाली होती. यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक विभागाने अपक्षांसाठीच्या चिन्हांचा पेटाराच उघडून दिला आहे. या पेटाऱ्यातून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.