पुणे : चाकणमधील मेफेड्रोन विक्री प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीला खेड न्यायालयामध्ये सुरुवात झाली असून या प्रकरणात ड्रग तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून खेड तालुक्यात ७ ऑक्टोबर २०२० रोजी २० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये ललित पाटील याच्यासह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात आठ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. उर्वरित बारा आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या खटल्याच्या सुनावणीला सुरवात झाली असून सरकार पक्षाकडून तक्रारदार पोलिस अधिकारी शाकीर जिनेरी यांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चाकण भागात एका मोटार गाडीतून २० किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. तपासात आरोपींनी रांजणगाव येथील कंपनीत तब्बल १३२ किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे दहा-पंधरा किलो मेफेड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणात पोलिसांनी अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह एकूण २२ जणांना अटक केली होती. याच गुन्ह्यात ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी आरोपींविरुद्ध २८ सप्टेंबर २०२१ रोजी खेड सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी मेफेड्रोन जप्त केले होते. न्यायालयात सादर केलेल्या नमुन्यांचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक विश्लेषण करण्यात आले नव्हते. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) तरतुदींची पूर्तता झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे पिंपरी पोलिसांच्या तपासावर टीका करण्यात आली होती.