नाशिक : विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन हॅक करून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारास पाडण्याची धमकी देणाऱ्या परप्रांतीय महाठकास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रारंभी विजय मिळवून देण्याची ग्वाही देत संशयिताने ४२ लाखांची खंडणी मागितली होती. त्यास नकार देण्यात आल्याने त्याने पराभव करण्याची धमकी देत पोबारा केला होता. शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने संशयितास मखमलाबाद शिवारातून शोधून काढले असून त्यास मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानसिंग नारायण चव्हाण (३४, मूळ रा. अजमेर, राजस्थान, ह.मु. विठूमाऊली कॉलनी, मखमलाबाद-म्हसरूळ लिंकरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. चव्हाण मार्बलचे काम करण्यासाठी गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वीच नाशिकला आला आहे. श्रीमंत होण्याच्या नादात राज्यातील निवडणुकांची संधी साधत त्याने ही क्लृप्ती सुचल्याची कबुली दिली आहे. मंगळवारी त्याने शिवसेना ठाकरे गटाचे मध्य नाशिक मतदारसंघाचे उमेदवार वसंत गिते यांचे संपर्क कार्यालय गाठले. प्रचार कार्यालयप्रमुख आनंद शिरसाठ यांची भेट घेत त्याने निवडणुकीत उमेदवारास निवडून आणण्याची ग्वाही दिली.
ईव्हीएम मशीन हॅक करून पडलेल्या दहा मतांपैकी तीन ते चार मतं आपोआप उमेदवाराच्या खात्यात जमा होतील. एकूणच उमेदवार विजयी होईल, अशी खात्री दिली. यावेळी त्याने या कामाच्या मोबदल्यात ४२ लाख रुपये द्यावे लागतील, तसेच अॅडव्हान्स म्हणून पाच लाख रुपयांची मागणी केली. कार्यालयप्रमुख शिरसाठ यांनी तसे करण्यास नकार दिला. संशयिताने तेथून काढता पाय घेत शिरसाठ यांना पैसे न दिल्यास निवडणुकीचे प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे असून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमच्या उमेदवारास पराभूत करेन, अशी धमकी देत धूम ठोकली.
याबाबत शिरसाठ यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दखल घेत संशयिताच्या मुसक्या आवळण्याचे आदेश जारी केले. हा गुन्हा शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाकडे वर्ग करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथके संशयिताच्या शोधार्थ रवाना करण्यात आली. मखमलाबाद शिवारातील विठू माऊली कॉलनी भागात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
संशयिताने दिली कबुली
अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या नादात महाराष्ट्रातील निवडणुकांची संधी साधत त्याने हे कृत्य केल्याची कबुली संशयिताने दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक रवींद्र बागूल करत आहेत. ही कारवाई उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार प्रशांत मरकड, प्रतीण वाघमारे, शरद सोनवणे, सदीय भांड, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, रमेश कोळी, कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, विशाल काठे, जगेश्वर बोरसे, किरण शिरसाठ आदींच्या पथकाने केली.