पुणेः विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ न देणाऱ्या महाविद्यालयाच्या चौकशीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अहवालानुसार महाविद्यालयावर काय कारवाई होणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मराठी विषय घेऊ दिला जात नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. शिक्रापूर तालुक्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून रोखले जात असल्याचे लेखी पत्र विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. त्यावर विद्यापीठाने चौकशी समिती स्थापन केली होती. परंतु, या समितीतील काही सदस्यांनी वैयक्तिक कारणास्तव या समितीत काम करणे शक्य नसल्याचे विद्यापीठाला कळवले. त्यामुळे विद्यापीठाने नवीन समिती स्थापन केली आहे.
मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संदीप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाने नवीन समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, मराठी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील डॉ. रमेश गायकवाड, तसेच अहमदनगर महाविद्यालयातील डॉ. सुधाकर शेलार यांचा या समितीमध्ये समावेश आहे.