पुणे : भारतात मातांचे बाळंतपण किंवा गर्भधारणेच्यावेळी होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 1990 ते 2013 या काळात कमी झाले आहे. त्यातच प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, जननी शिशुसुरक्षा कार्यक्रम, गर्भवती आणि स्तनदा माता आणि मुलांसाठी पोषण अभियान अशा योजनांमुळे पुणे शहरात मागील तीन वर्षात मातामृत्यूंच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात 2022 मध्ये 35 मातामृत्यूंची नोंद झालेली आहे तर 2023 मध्ये 29 मातामृत्यूंची नोंद झाली आणि एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीत 12 मातामृत्यूंची नोंद झाली आहे. पुणे शहरात मागील तीन वर्षात मातामृत्यूचे प्रमाण 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. गर्भावस्थेमध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिका स्तरांवर विविध योजना राबवण्यावर भर दिला जात आहे.
मागील तीन वर्षात उपचार घेत असताना पुण्यात 205 मातामृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी पुण्यातील रहिवासी असलेल्या मातांचे प्रमाण 76 आहे तर उर्वरित 129 माता या पुण्यातील ग्रामीण भागातील आणि इतर जिल्ह्यातील आहेत.
मातामृत्यूंची एकूण आकडेवारी…
– 2020-23- 90
– 2023-24-79
– 2024 (एप्रिल ते सप्टेंबर)-36
माता मृत्यूची प्रमुख कारणे…
-बाळंतपणात किंवा प्रसुतीनंतरच्या काळात जास्त रक्तस्त्राव हे मातामृत्यूचे प्रमुख कारण आहे.
-बाळंतपणात महिलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. गर्भधारणेदरम्यान आणि प्रसुतीनंतरच्या काळात संसर्ग पसरु शकतो आणि माता मृत्यू होऊ शकतो.
-विशेषत: ग्रामीण भागात अस्वच्छता, अपुरी प्रसुतीपूर्व काळजी आणि अशुद्ध प्रसुती पद्धती हे थेट कारण असू शकते.
-जर एखाद्या स्त्रीला आधीच अशक्तपणा, कुपोषण, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गर्भधारणेचे कोणतेही उच्च रक्तदाब विकार यांसारख्या पूर्व- अस्तित्वातील आजारांनी ग्रासले असेल तर गर्भधारणा आणि बाळंतपणामध्ये अनेकदा धोका वाढतो.