पुणे : गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा जाणवत असून थंडीची चाहूल सुरु झाली आहे. राज्यातील थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत आणखी वाढणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या दिवसात थंडीची तीव्रता वाढत असते यंदा मात्र दिवाळी उलटूनही थंडीची म्हणावी तशी तीव्रता पाहायला मिळालेली नाही. पण आगामी दिवसात चांगलाच गारवा जाणवू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात सध्या कमाल आणि किमान तापमानामध्ये चढ-उतार सुरुच आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि नंतर थंडी असे वातावरण आहे. थंडी पडल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणाच्या नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे. पुढील काही दिवस तापमान असेच राहणार आहे.
राज्यातील तापमानात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या चढ-उतारांमुळे नागरिकांनी पाऊस, थंडी, उकाडा या तिन्ही ऋतूंचा अनुभव घेतला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य व पूर्व भारतात 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेला तापमानात घट होणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाश आणि छान असा नजारा पाहायला मिळत आहे.