इंदापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली असून आमची लाडकी बहीण आम्हाला पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मदत करेल, असे विश्वासपूर्वक उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निमगाव केतकी येथे काढले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, दत्तात्रय भरणे, संजयकाका पाटील, अप्पासाहेब जगदाळे, देवराज जाधव, अंकुश जाधव, दशरथ डोंगरे, ज्ञानदेव बनकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, वैशाली नागवडे, संजय सोनवणे, बाळासाहेब सरवदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आजचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ज्यांनी केला हे पाहून जयंतराव पाटील यांनाही असे वाटले असेल, की आपण विनाकारण घाई केली. आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी दिली असती तर बरं झालं असतं. आप्पासाहेब जगदाळे यांनी पक्ष प्रवेश करताना अनेक सहकाऱ्यांना आपल्या सोबत घेऊन आले. आणि आणखीन म्हणतात अजूनही अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. अरे तिकडे काय ठेवता की नाही? असा सवाल करत तिथे फक्त चार जण शिल्लक ठेवता की काय? असे म्हणताच श्रोत्यांमधून हास्यकल्लोळ पिकला.
निमगाव केतकी मध्ये येत असताना मला जुन्या आठवणी येतात. मला शनिवारचा बाजार आठवतो. कडब्याचा बाजार आठवतो. जगन्नाथ मोरे यांचे घर आठवते. त्याचसोबत एकनाथ हेगडे, अण्णासाहेब हेगडे यांची आठवण येते. या माणसांना मी कधीही विसरू शकत नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, या राज्याचा काय पलट करत असताना आपला जिल्हा, तालुका कुठेही मागे राहू नये, म्हणून इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सहा हजार कोटी रुपयांचा विकास निधी दिला. त्यामधून तालुक्यातील वेगवेगळ्या गावांचा, वाडी वस्तीचा मूलभूत विकास करण्याचा प्रयत्न केला गेला. आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात एवढा मोठा निधी कधीही इंदापूर तालुक्याला मिळालेला नव्हता, असे ठामपणे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार पुढे म्हणाले, जनतेचे प्रश्न सोडवणे हे आपलं कर्तव्य असतं. इंदापूर तालुक्यातील काही संस्थांचा मी माझ्या भाषणातून सूतोवाच केला. संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत त्यामधून सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. इंदापूर तालुक्यातील बावीस गावचा पाणी प्रश्न अनेक दिवसांपासूनचा आहे. युतीच्या काळातील जलसंपदा मंत्री महादेव शिवलकर, एकनाथ खडसे आदींनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु या ना त्याकारणाने 22 गावचा पाणी प्रश्न सुटला नाही.
मध्यंतरीच्या काळात दत्तामामा भरणे राज्यमंत्री असताना हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सोलापूर जिल्ह्याने वेगळ्या पद्धतीने दबाव तंत्र वापरले त्यामुळे या प्रश्नाची सोडवणूक होऊ शकली नाही असा खुलासा अजित पवार यांनी केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली असून आमची लाडकी बहीणच महायुतीची सत्ता स्थापन करायला निश्चित मदत करेल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, अंकुश जाधव, चित्तरंजन पाटील, माजी नगरसेवक अदिकुमार गांधी, वसंतराव मोहोळकर, बाजार समितीचे माजी सभापती विलासराव माने, कांतीलाल झगडे, तुषार जाधव, रोहित मोहोळकर, किरण बोरा, नारायण आबा वीर, एडवोकेट रामकृष्ण मोरे, मनोज जगदाळे, रवींद्र सरडे, प्रदीप जगदाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश झाला.