पुणे : राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. अशातच बोपदेव घाटात दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली आहे. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रमेश राठोड (वय २७, रा. शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, केशवननगर, मुंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातात दुचाकीस्वार अक्षय अर्जुन मोरे (वय २७, रा. कडनगर, उंड्री, कोंढवा) याला दुखापत झाली असून, भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोरेविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार दिनेश रासकर यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अक्षय आणि त्याचा मित्र बोपदेव घाटातून कोंढव्याकडे निघाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास बोपदेव घाटातील वळणावर दुचाकी अचानक घसरली.
अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गणेश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर दुचाकीस्वार अक्षय याला किरकोळ दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या गणेशचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलीस हवालदार रासकर तपास करत आहेत. बोपदेव घाटात तीव्र उतार आहे. तीव्र उतारावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत असतात.