वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) : येथील एका १९ वर्षीय तरुणीची छेड काढून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम वडिलाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील शारदा (काल्पनिक नाव) हिच्या आईचे निधन झाल्याने ती वडील व दोन भावासह वास्तव्यास आहे. वडील मिस्त्री काम करतात, तर मोठा भाऊ मद्यपी असून लहान भाऊ कंपनीत काम करतो. दोन महिन्यांपासून घरात एकटी असताना तिचे वडील सुभाष हे मुलीची छेड काढून तिला त्रास देत होते.
वडील सतत छेड काढत असल्याने काही दिवसांपूर्वी तिने घटनेची माहिती शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या आपल्या मामा-मामीला दिली होती. यानंतर रात्री झोपण्यासाठी तिचे मामा-मामी आपल्या घरी घेऊन जात होते. हे पाहून वडील सुभाष हा तिला सतत शिवीगाळ व मारहाण करुन मामाच्या घरी झोपण्यासाठी जाऊ नको, असा दम भरत होता. मात्र, शारदा ही वासनांध वडिलाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करुन मामा-मामीच्या घरी जात असल्याने संतप्त सुभाष हा शारदास जिवे मारण्याच्या धमक्या देऊन तिची छेड काढत होता.
एकटी असल्याची साधली संधी
तीन दिवसांपूर्वी (दि. ३) शारदा घरात एकटी असताना वडील सुभाषने तिला आपल्या जवळ ओढत मिठी मारुन तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे घाबरलेल्या शारदाने आरडा-ओरड केली असता शेजारीच राहणाऱ्या मामीने तिच्या घरी येत वडील सुभाष याच्या तावडीतून तिची सुटका केली. सायंकाळी मामा घरी आल्यानंतर मामीने या प्रकाराची माहिती पतीला दिली. अनेकदा समजावूनही मेहुणा भाचीला त्रास देऊन तिची सतत छेड काढत असल्याने तिला सोबत घेत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन वडील सुभाषविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय गिते करत आहेत.