नवी दिल्ली: महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना नवी दिल्लीत शरद पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नसल्याचा आरोप शरद पवार गटाने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असा डिस्क्लेमर दिला जात आहे, असे अजित पवार गटाने सांगितले. परंतु शरद पवार गटाने त्यावर आक्षेप नोंदवला आहे.
तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा डिस्क्लेमर देत आहात का? अशी विचारणा न्यायालयाने अजित पवार यांच्या वकिलाला केली. त्यावर दररोज नाही मात्र गरजेच्या ठिकाणी आम्ही प्रकटीकरण देत आहोत, असे अजित पवार गटाकडून सांगण्यात आले. त्यावर पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य असेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत..
आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असा डिस्क्लेमर दिला जात आहे, असा दावा अजित पवार यांच्या वकीलांनी केला खरा परंतु हा दावा शरद पवार गटाने खोडून काढला. त्यामुळे प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का? अशी विचारणा न्यायालयाकडून करण्यात आली. अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचे शरद पवार यांचे वकील प्रांजल अगरवाल यांनी दावा केला. तसेच अनेक ठिकाणी हे डिस्क्लेमर दिले नाही, त्याचे स्क्रीनशॉट आहेत, असेही आगरवाल यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य असेल, असे निर्देश दिले आहेत.