रत्नागिरी : माध्यम कक्षाला सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक जनक प्रसाद पाठक, खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) राजेंद्र प्रसाद मीना यांनी भेट दिली. या वेळी पाठक यांनी विधानसभा निवडणूक कालावधीत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक विशेषतः उमेदवारांच्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या आक्षेपार्ह बातम्या, मजकुरांवर आणि पेड न्यूजवर लक्ष ठेवा, अशा सूचना दिल्या.
विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरांवर तसेच पेड न्यूज, आक्षेपार्ह, चुकीच्या व अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा. उमेदवारांच्या प्रत्येक समाजमाध्यम खात्याची वेळोवेळी तपासणी करा, असेही पाठक यावेळी म्हणाले. खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी या वेळी उमेदवारांच्या जाहिरात खर्चावर तसेच समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवा. पेड न्यूजबाबत विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना केली. या वेळी निवडणूक निरीक्षकांनी एकूण कामाबाबत समाधान व्यक्त केले. एमएसीएमसी नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.