मुलचेरा (गडचिरोली): तालुक्यातील देशबंधूग्राम येथील रहिवासी अनादी अमूल्य सरकार (४०) याला सन २०१२ मध्ये अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात मुलचेरा पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीने न्यायालयाबाहेरून पोलिसांना चकमा देत पसार झाला होता. तब्बल १२ वर्षांनंतर पोलिसांनी आरोपीला ४ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले.
सन २०१२ पासून आरोपी अनादी सरकार हा पोलिसांच्या तावडीतून पसार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला तरीही त्याचा शोध लागला नाही. दरम्यान, ३ नोव्हेंबर २०२४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी अनादी सरकार हा देशबंधूग्राम येथील आपल्या राहत्या घरी आला आहे. या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तसेच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप साखरे, पोलीस हवालदार चरणदास कुकडकार, पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, पोलीस शिपाई संतोष दहेलकर, पोलीस शिपाई बाळू केकान, पोलीस शिपाई सचिन मंथनवार, महिला पोलीस शिपाई जयश्री आव्हाड, महिला पोलीस शिपाई शोभा गोदारी यांनी सोमवारी (४ नोव्हेंबर) देशबंधूग्राम येथील आरोपीच्या घरी सापळा रचून आरोपीला अटक केली.
अटक केल्यानंतर आरोपीला चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुलचेरा येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केली.