सोलापूर : बँकेत खाते उघडण्यासाठी येऊन ओळख करून मोबाईल व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून नंतर बँक कर्मचाऱ्यास ब्लॅकमेल करत पैशाची मागणी केल्याची आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान मुरारजी पेठ परिसरातील युको बँक येथे घडली.
सोनाली अभिजीत राजकर आणि अभिजीत राजकर (दोघे रा. विजापूर रोड, सोलापूर) अशी त्या ब्लॅकमेल केल्यानंतर गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. आकाश सुभाष गायकवाड (वय ३९, रा. काटी, तुळजापूर, उस्मानाबाद) हे सोलापुरातील मुरारजी पेठ परिसरात असलेल्या युको बँकेत कर्मचारी आहेत. दि. १५ ऑक्टोबर रोजी ते आपल्या बँकेत काम करत असताना आरोपी सोनाली अभिजीत राजकर ही त्यांच्याकडे बँकेत खाते उघडायचे आहे, असे बोलून त्यांच्याबरोबर ओळख करून घेतली होती.
या ओळखीतूनच तिने त्यांच्याकडून मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर व्हॉट्सॲप मेसेज चॅटिंग सुरू केली होती. या चॅटिंगच्या ओघात बँक कर्मचारी आकाश गायकवाड यांच्याकडून पाठविलेल्या मेसेजेसचा फायदा घेऊन आरोपीने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा प्रकार मिटविण्यासाठी आरोपी सोनाली अभिजीत राजकर आणि अभिजीत राजकर या दोघांनी त्यांना धमकावून शहरातील दत्त हॉटेल येथे बोलावून घेतले. दि. ४ नोव्हेंबर रोजी हॉटेलच्या आत त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती त्यांनी २ लाख रुपयाची मागणी करून पैसे न दिल्यास तुला जेलची हवा खायला पाठवितो, अशी धमकी देत दमदाटी केली.
याबाबत आकाश गायकवाड याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३), ३५१ (२) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांच्या अटकेसाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.