मुंबई: निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्याची ११ वाजताची डेडलाइन नियमानुसारच निश्चित केली आहे. याबाबतची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली होती, अशी भूमिका घेत निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात आपल्या डेडलाइनचे समर्थन केले. ११ वाजण्याच्या डेडलाइनवर उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र सादर करताना याचिकेलाच जोरदार आक्षेप घेतला. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने याची दखल घेत याचिकाच फेटाळून लावली.
वांद्रे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आकिफ अहमद दफेदार यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला. दफेदार यांनी सकाळी ११ वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे कारण देण्यात आले होते.
मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला आक्षेप घेत दफेदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात गत सुनावणीच्यावेळी खंडपीठने निवडणूक आयोगाला ११ वाजण्याच्या डेडलाइनवरून चांगलेच धारेवर धरत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आयोगाच्या वतीने अॅड. अक्षय शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. ३० ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ वाजताची डेडलाइन ठेवण्याबाबत सूचना देण्यात आली होती.