नवी मुंबई: मागील चार दिवसांपासून वाशीतील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात नाफेडमधील कांद्याची आवक बंद आहे. त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याने जुना कांदा चांगलाच भाव खात आहे. सोमवारी बाजारात उच्च प्रतिच्या कांद्याला ५७ रुपये, तर मध्यम कांद्याला ३० ते ५० रुपये भाव मिळाला. तर, आगामी दिवसांत मुबलक प्रमाणात कांद्याची आवक न झाल्यास दर आणखी वधारण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
मागील काही दिवसांपासून नवीन कांद्याचे उत्पादन कमी होत असल्याने बाजारात आवक घटली आहे. त्यामुळे मागणी प्रमाणे कांदा पुरवठा होत नसल्याने जुना कांदा अधिक भाव खात आहे. कांदा हा चवीला गोड असल्याने जेवणासाठी जुन्या कांद्याला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे मागील एक महिन्यापासून बाजारात जुन्या कांद्याचे दर ४५ ते ५० रुपयांवर आहेत. बाजारात नवीन कांद्याच्या २५ गाड्या, तर जुना कांद्यांच्या ५० गाड्यांची आवक आहे. मात्र, यामध्ये देखील हलका, खराब कांदा मोठ्या प्रमाणात येत असून त्यामुळे उच्चतम प्रतिच्या कांद्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे जुन्या कांद्याचे दर कडाडले आहेत, अशी माहिती कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
देशी कांद्याच्या दरात वाढ होऊ नये, म्हणून अंकुश ठेवण्यासाठी बाजारात इजिप्तचा कांदा दाखल होत आहे. मात्र, या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. इजिप्तचा कांदा हा आकाराने मोठा असून अधिक लालसर असतो, तर देशी कांदा मध्यम आकाराचा व चवीचा असतो. या इजिप्तच्या कांद्याला हॉटेल व्यावसायिक पसंती देत होते; परंतु यावेळी हॉटेल चालकांनी देखील नापसंती दर्शवली आहे.