राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये २ लाख ३८ हजार ४०९ मतदार असून पुरुषांपेक्षा १०,५७० महिला मतदार अधिक आहेत. एकूण १ लाख २४ हजार ५७० महिला आणि १ लाख १३ हजार ८३९ पुरुष मतदार अशी विभागणी असल्यामुळे येथील निवडणूक आखाड्यातील उमेदवारांचे भवितव्य सावित्रीच्या लेकींच्या हातामध्ये राहणार आहे.
सध्या भातकापणी हंगाम अंतिम टप्प्यामध्ये असून भातकापणीच्या कामामध्ये महिला गुंतल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक निकालामध्ये निर्णायकी ठरणाऱ्या महिला मतदारांनी आपल्याच उमेदवाराला मतदान करावे, यासाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि स्वतः उमेदवार कोणकोणते फंडे वापरणार? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशासनाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये २ लाख ३८ हजार ४०९ मतदारांची नोंद झाली आहे. अंतिम मतदार यादीमध्ये १ हजार ३५८ दिव्यांग आणि ४ हजार ४१० युवा मतदारांचा समावेश आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये पुरुष पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी, कार्यकर्त्याही यामुळेच जोमाने उतरल्याचे चित्र दिसत आहे.