पिंपरी : मित्राला मारहाण होत असताना मध्ये पडल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करत बोट तोडले. या प्रकरणी रविवारी (दि. ३) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपुकुमार वुपेंद्र खरवार (वय २७, रा. वाघमारे चौक, वाकड) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चैतन्य नागनाथ माने (वय २० रा. तापकिरमळा, काळेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. तर साथीदार मन्या ऊर्फ विशाल मनोहर कांबळे (वय २२ रा. थेरगाव) याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि.१) रात्री अकराच्या सुमारास वाकड येथे फिनिक्स मॉलजवळ घडली. फिर्यादी यांचा मित्र कुमरेश बिकाऊ सहाणी हा जेवण करू घराकडे जात होता. दरम्यान आरोपींनी त्याला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी खरवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली. कोयत्याने वार करून बोट तोडले. यामध्ये खरवार गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वाकड पोलिसांनी एकला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.