पुणे: बोपदेव घाटात महाविद्यालयीन युवतीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणाला महिना उलटला तरी, त्यातील तिसरा आरोपी सोमनाथ ऊर्फ बापू यादव अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. याबाबत गांभीर्यान शोध जारी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
यासंदर्भात अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर आठवडाभराने रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) या आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा साथीदार शोएब ऊर्फ अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला १४ ऑक्टोबर २०२४ ला अटक करण्यात आली. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर तिसरा फरारी आरोपी यादव याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक कार्यरत करण्यात आले आहे.
बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर २०२४ ला रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात निरनिराळ्या स्तरांमध्ये उमटले. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्त्यांवरील ४५० सराईत गुन्हेगारांची चौकशी केली. तसेच, पुणे जिल्ह्यातील लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींकडेही तपास करण्यात आला. आरोपीचा माग काढण्यासाठी स्थानिक पोलिसांबरोबरच शहर गुन्हे अन्वेषण विभागाची एकंदर ६० पथके कार्यान्वित करण्यात आली होती. या घटनेआधी पंधरवडाभरात बोपदेव घाटामार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली.
या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी आरोपी कनोजिया याला येवलेवाडी परिसरात गुरुवारी १० ऑक्टोबरला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून आरोपी अख्तर शेख याची माहिती पुढे आली. त्यानंतर शेख याच्या शोधासाठी पोलीस उत्तर प्रदेशला रवाना झाले. तेथील छोट्या मोठ्या गावांमध्ये या पथकाने अख्तरचा शोध जारी केला. मात्र, तो नाव व वेशभूषा बदलून त्यांना गुंगारा देत होता. अखेर अलाहाबादजवळील एका छोट्या खेड्यात पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद केले.
या प्रकरणातील दोघे आरोपी हाती लागले असले, तरी तिसरा आरोपी यादव अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला फरारी घोषित करून त्याची माहिती देणाऱ्याला स्वतंत्र इनाम जाहीर करण्याची प्रक्रिया पोलिसांनी जारी केली आहे. यापूर्वी आरोपींची माहिती देण्यासाठी पोलिसांनी १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. फरारी आरोपी यादव याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्यातील अनेक गावे पिंजून काढली. तसेच, तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने हाती आलेल्या माहितीनुसार परराज्यामध्येही त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, तो अद्याप हाती लागला नाही.