पुणे : पुण्यात एका अल्पवयीन मुलीने आपला बालविवाह लावून देणाऱ्या आपल्या आई-वडिलांसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पीडित मुलीच्या पतीसह सासर व माहेरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा ती 17 वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी तिचा एका 22 वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिला होता. त्यानंतर तिच्या पतीने ती अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. हा प्रकार असह्य झाल्यामुळे पीडितेने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेत आपल्या पतीसह सासर व माहेरच्या नातलगांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार मुलीचा 22 वर्षीय पती, 46 वर्षीय सासरे, 42 वर्षीय सासू, 45 वर्षीय वडील व 38 वर्षीय आई यांच्याविरोधात बलात्कार, पोक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी संगनमताने अल्पवयीन पीडितेचा विवाह लावून दिला. त्यानंतर पतीने वारंवार तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याने ती गरोदर राहिली. त्यातून तिला त्रास उद्भवू लागल्यामुळे तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. निंबाळकर करत आहेत.