नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर गावसकर करंडकमधून ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. मात्र, घरच्या मैदानातील पराभवामुळे भारतीय संघावर दडपण असेल, असे आंतरराष्ट्रीस क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला वाटते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची या अगोदरच घोषणा करण्यात आली आहे. यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यामुळे भारतीय संघात बदल होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र, सध्या तरी संघ कायम असेल, असे चित्र दिसत आहे. भारताचा पराभव आणि खडतर ऑस्ट्रेलियन दौऱ्यासंदर्भात वॉर्नर म्हणाला, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येत आहेत आणि त्याआधी त्यांना घरच्या मैदानात ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत, अनुभवी खेळाडूंनी सज्ज असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सामना करणे आव्हानात्मक असेल. त्यांचे मानसिक मनोबल पूर्णपणे खचलेले असताना आगामी दौरा नक्कीच सोपा नसेल, असे वॉर्नर म्हणतो.
ऑस्ट्रेलियन संघाकडे सध्या सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आणि अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. या परिस्थितीत उसळत्या खेळपट्ट्या भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरतील, असे त्याला वाटते. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीतील फलंदाजांना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजचा सामना करण्यासाठी आणखी मजबूत मार्ग शोधावा लागेल. भारतीय संघासाठी धोक्याचा इशारा जाहीर करणाऱ्या वॉर्नरने न्यूझीलंडची प्रशंसा केली. टॉम लॅथम आणि त्याच्या संघाचे अभिनंदन. पहिल्या कसोटीत न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम झेल घेतले आणि त्यामुळे मालिकेतील शानदार मोहिमेचा पाया उभारता आला. भारतीय भूमीवर जिंकणे किती कठीण आहे, याबाबतची जाण आहे. विजयाचे श्रेय नक्कीच त्यांना द्यायला हवे, असे वॉर्नर म्हणाला.