मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार सत्तेत येईल याची शाश्वती नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत असतीलच, हे सांगणेही कठीण असल्याची जोड त्यांनी आपल्या विधानाला दिली. निवडणुकीनंतर कोण कोणासोबत असेल, हे देखील सांगता येणार नाही, असे भाकीतही त्यांनी वर्तवले.
विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत आहेत. जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही. अनेक ठिकाणी अर्ज मागे न घेतल्याने बंडखोरी झाली आहे. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. अशातच मलिकांनी विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. ‘राजकारणात काहीही होऊ शकते. माझ्या उमेदवारीला अनेकांनी विरोध केला. परंतु, पवार यांनी कोणालाही न जुमानता उमेदवारी जाहीर केली आणि कायमही ठेवली.
हे केवळ अजित पवारच करू शकतात,’ असे सांगून मलिक यांनी ‘निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येईलच याची शाश्वती नाही. निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आले, तरी अजित पवार त्यांच्यासोबत असतील की नाही, याबाबतही आता काही सांगता येत नाही. मुळात निकालानंतर कोण कोणासोबत असेल, याबाबतच साशंकता आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारणात नेहमी परिस्थिती बदलत राहते. त्यामुळे काहीही घडू शकते,’ असे मलिक म्हणाले. मलिक यांच्या या विधानामुळे अजित पवार महायुतीची साथ सोडण्याच्या विचारात आहेत का, या चर्चेला राजकीय वर्तुळात सुरुवात झाली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले, हे अत्यंत चुकीचे आहे. अजित पवार यांनी मला वैयक्तिकरीत्या खूप मदत केली. म्हणूनच पक्षफुटीनंतर मी त्यांना साथ दिली, अशी माहिती देऊन मलिक यावेळी म्हणाले, अजित पवार भाजपसोबत असले, तरी त्यांनी त्यांची मूळ विचारधारा सोडलेली नाही.